Wednesday, 25 March 2015

शेतकर्‍यांच्या प्रगतिची यशोगाथा


आमच्याकडे ( वसंत होळकर, लासलगाव  ) साडेसात एकर जमीन आहे . पण पाण्याअभावी ती कोरडवाहूच आहे.  आमचे  त्यामुळे म्हणावे असे ऊत्पन्न निघत नाही. त्यामुळे वडिलांसह आम्ही दोघेही भाऊ कायमच चिंतेत असतो व सतत काहीतरी करण्याच्या विचारात असतो . जमिनीतून उत्त्पन्न मिळत नाही म्हणून वडिलांनी एका दुकानात त्यांच्यासाठी काम पहिले. ते एका कापड दुकानात कामाला लागले. महिन्याला  १००० रु.मिळत होते त्यांना. आम्हीही रोजाराजी करायचो व घर चालवायला वडिलांना मदत करायचो. आता बहिणीही मोठ्या झाल्या होत्या. त्यांच्या लग्नाचाही विचार वडिलांना होताच. दिवसेंदिवस परिस्तिथी ढासाळत चालली होती. कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. काय करावे काही कळेनाच. वडिलांनी आमच्या दोनीही बहिणींची लग्न थाटात लाऊन दिले. वडिलांचे काम चालूच होते. ते काही थांबेना. त्यांची चिंता आता अधिक वाढू लागली होती. कारण आमच्याही शिक्षणाच ओझ त्यांच्या डोक्यावर होतच.
    मी बी.एस्सी. झालो होतो. नोकरीच्या शोधात होतो. नोकरी काही मिळत नव्हती. कॉम्पुटर शिकायला हव अस वाटायचं . पण पैसे नव्हते म्हणून गप्प बसायला लागत होत. मोठा भाऊ बी.ए .बी.एड. झाला होता. तो आता इंग्रजीचे क्लास घ्यायला लागला होता . आता त्याचाही हातभार लागत होता घर चालवायला. पण आता त्याचेही लग्न करून टाकायला हवे असे आईचे मत होते आई कंटाळली होती. कामाला,संसाराला अन जीवनाला. म्हणून ती खंत व्यक्त करत होती. आईचे म्हणणे वडिलांना पटत होते त्यांनीही मुलगी बघायला सुरुवात केली .पण परिस्थिती पाहून कुणी मुलगी द्यायला तयार नव्हते. वडिलांचे एक मित्र होते कापड दुकानातले त्यांनी एक स्थळ आणले होत. मुलगी दिसायला सुंदर होती पण तिच्याघारीही अठरा  विश्वे दारिद्र्य होत. त्यांनाही मुलगा पसंद होता. पण लग्नाची ऐपत मुलीच्या वडिलांत नव्हती. ते लग्नाला तयार होते पण लग्नाच्या सर्व खर्चाची जबाबदारी त्यांनी आमच्यावर सोपवली होती तरच ते लग्न करणार होते तिचं. माणसे चांगली होती,मुलगीही सर्व बाबतीत हुशार होती. लग्नाला  माझे वडील तयार झाले. त्यांनी दुकान मालकाकडून कर्ज उचलले होते. भावाच  लग्न झालं. अजून थोड कर्ज वाढलं.आता खाणार्यांची संख्याही घरात वाढू लागली होती.
      पावसाळा जवळ आला होता. शेतीची तयारी लोक करत होत.आमच्याकडे बियाणे खरेदी करण्यास् पैसे नव्हते. सावकाराकडून कर्ज घेऊन बियाणे आणले. योगायोगाने पाऊस चांगला झाला. सात एकर मका पिक आम्ही घेतले.त्यातून आम्हाला बरीच अपेक्षा होती. वाटल होत कि डोक्यावरचा बराचसा भार हलका होईल. पण अपेक्षा भंग झाला. म्हणावे तसे उत्पन्न झाले नाही. ज्यांच्या कडून कर्ज घेतले होते ते लोक आता चकरा मारायला लागले होते. वडिलांचे टेन्शन वाढत होते. कुठून पैसे द्यावे हाच प्रश्न त्यांना कायम सतावत होता. वडील त्यावर मार्ग काढत होते.पण कर्ज फेडणे इतके सोपे नव्हते. यावर आता एकच मार्ग उरला होता तो म्हणजे जमीन विकण्याचा किंवा आत्महत्या करण्याचा.परंतु खचून न जाता  गावाजवळची  अर्धा एकर जमीन गेली तरी चालेल पण जीवन संपवण्यात काही अर्थ नाही असा धीरच जणू वडील स्वताला देत होते. तिच्यात काही पिकत नव्हते. वडिलांनी गिऱ्हाईक  आणले होते. जमिनीचा व्यवहार झाला. अर्धा एकर शेत ५० लाखाला विकले. आता सर्व चित्र बदलले होते. सर्व कर्जाची परत फेड झाली होती. वडिलांनीही नोकरी सोडून दिली होती.
 आता सर्वजन शेतात प्रगती करण्याच्या मागे लागलो. आमच्या शेतापासून एक किलोमीटर अंतरावरून पाण्याचा पाट गेला होता. तेथे आम्ही विहारीसाठी जागा घेउन विहीर खोदली. पाणी चांगले लागले. आता आमच शेत हिरव होणार होत. आम्ही पाच एकरावर द्राक्ष बागेची आखणी केली. पाइप लाईन केली. आमच्या शेतात पानी आल खर पण पैसा भरपूर खर्च झाला होता. द्राक्ष बागेची लागवड, फौंडेशन, मजुरी, खते याचाही खर्च होताच. दिवसा मागून दिवस चालले होते. द्राक्ष बागेचा एवढा अनुभव नव्हता. आजू बाजूच्या शेतकऱ्यांना माहिती विचारायची व तो प्रयोग आपल्या शेतावर करायचा असा ठेका आता मी धरला होता. पहिले वर्ष अनुभव घेता घेता गेले. पैसे जवळजवळ संपलेच होते. कुठे खर्च झाले व कशे  खर्च झाले काही कळेनाच. पण एक गोष्ट लक्षात आली होती की, भावाला जुगार,मटका खेळण्याचा नाद लागला होता. त्यानेच खूप पैसे उडवले. वडील चिंतेत होते जमीन विकूनही प्रगती   झाली नव्हती. जमीनही गेली होती अन आलेला पैसा ही खर्च होऊन गेला होता. भावाला आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला. त्याला जुगाराच्या नादापासून दूर करण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याचा नाद काही जात नव्हता. वडिलांना खूप टेन्शन येत होते. वडील आजारी पडले. उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्याच्या आधीच त्यांचे निधन झाले.याला कारण होते फक्त आमची परस्थिती आणि माझा भाऊ.
     या सर्व परिस्थितून आम्हाला सावरायचे होते. याची सर्व जबाबदारी माझ्या खांद्यावर आली होती. मी लहान असूनही घरचा कारभार माझ्या हातात घेतला होता. भावाणेही वडिलांचे जाने जास्तच मनावर घेतले होते. तो घर सोडून निघून गेला होता. मी त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो मला कुटेही भेटला नाही. माझावर सर्व जबादारी आली होती कुटुंब सांभाळण्याची.
       बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आलेल्या परिस्थितीला सामोरे जाने एवढाच पर्याय आता उरला होता. पाच एकरात मला फक्त दोन लाख रुपये झाले होते. खर्चही निघाला नव्हता. दोन वर्षे अशीच वाया गेली उत्पन्ना विना. तिसर्या वर्षी मात्र कसून शेतीवर लढलो. आता अनुभवही आला होता. मनाशी निश्चय केला की, द्राक्ष अशी बनवायची कि तिची निर्यात झाली पाहिजे. दोन एकर रान मी १५ ऑगस्ट रोजी छाटले व बाकीचे तीन एकर रान मी ५ सप्टेंबर रोजी छाटले.  पाऊस  होताच. रोगांचीही खूप भीती होती. परंतु धाडस केले होते. अनेक वेळेला पाऊस उघडल्या नंतर रात्रीच्या वेळी देखील मी फवारणी करत होतो. बागेची संपूर्ण काळजी घेत होतो. याचे फळ मला मिळाले होते. द्राक्ष पक्व झाले होते. अर्थात क्वालिटी देखील चांगली होतीच. म्हणून माझी द्राक्ष व्यापाऱ्याने ८० रु. प्रती किलो दराने खरेदी केले. एकरी २५०  क्विंटल द्राक्ष निघाली होती. असा माझा पाच एकर बाग होता. सगळीकडे माज्या नावाची चर्चा सुरु होती कि याने एकरी विक्रमी उत्पादन घेतले. भरपूर पैसा आला होता.माझी पंचक्रोशीत सगळीकडे वाहवाह चालली होती. एक दिवस तर पत्रकार मित्र देखील आले होते माझी मुलाखत घ्यायला.ते मुलाखत घेऊन गेले. माझी यशोगाथा पेपर  मध्ये छापून आली. माझा घर सोडून गेलला भाऊ देखील पेपर मध्ये माझी यशोगाथा बघून परत आला होता. आता जुगार सोडून देईन व शेतीवरच संपूर्ण लक्ष देईन अशी शप्पथ त्याने घेतली होती. या आलेल्या उत्पन्नातून मी कर्ज फेड केली. उरलेल्या पैशातून जमीन विकत घेतली.
     अशा प्रकारे माझी दर वर्षी शेती चालूच होती. मी शेतीत अनेक प्रयोग करत होतो. उत्पन्न हि चांगले मिळत होते. अशी यशस्वी शेती करून माझी प्रगती दिवसेंदिवस वाढत चालली होती. आता माझ्याकडे ऐकून २५ एकर द्राक्ष बाग आहे तसेच तीन चार चाकी गाड्या देखील आहे. फवारणीसाठी २ कुबोटा ट्रक्टर आहे व एक मिशीफर्ग्युसन ट्रक्टर आहे. मी रासायनिक खते न वापरता जास्तीत जास्त सेंद्रिय खते वापरतो. त्यामुळे द्राक्षांची प्रत चांगली येते   मालाचे वजनही वाढते अन खर्चही कमी होतो.
ऐके काळी द्राक्षांची काहीही माहिती मला नव्हती अन आता मला लोक माहिती विचारतात याचा मला अभिमान आहे. मी गर्व न बाळगता शेतकरी बांधवांना मदत करत असतो. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी खचून न जाता आलेल्या परिस्थितीवर मार्ग काढला तर नक्कीच यश आपल्याला भेटते व आयुष्यात वेगळ्यास्थानी जाऊन बसण्याची संधी आपल्याला प्राप्त होत असते. केवळ आत्महत्या हा अडचणींपासून दूर जाण्याचा मार्ग नाही तर थोडा संयम ठेऊन प्रयत्न केले तर यश आपल्या हाती येते.      

No comments:

Post a Comment